Ad will apear here
Next
महाकवी कालिदास
काव्य आणि नाट्य या साहित्यशाखांच्या जागतिक विद्यापीठाचा कविकुलगुरू
नुकताच आषाढ महिना लागला आहे. कालिदासाच्या ‘मेघदूत’ या महाकाव्याच्या दुसऱ्या श्लोकात ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ असे शब्द आहेत. म्हणूनच त्या दिवशी जगभर कालिदासाचे स्मरण केले जाते. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत कालिदास आणि त्याच्या अजरामर रचनांबद्दल...
.....
कालिदास हा जगद्विख्यात कवी आणि नाटककार आहे. त्याच्या रचनांचा अभ्यास आणि आस्वाद रसिक/विद्वान शेकडो वर्षे घेत आलेले आहेत. जगातील सर्व भाषांमध्ये त्याच्या मूळ संस्कृत अक्षर वाङ्मयाचे अनुवाद झालेले आहेत. कालिदासावर असंख्य ग्रंथ लिहिले गेले आहेत. कै. प्रा. वा. वि. मिराशी यांनी अनेक संदर्भ ग्रंथ, तसेच संशोधनपर लेखांचा परामर्श घेऊन कालिदासाचे विस्तृत चरित्र लिहिले आहे. अन्य अनेक भारतीय विभूतींप्रमाणे कालिदासाचा जन्मकाल आणि कर्मभूमीबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही. 

नुकताच आषाढ महिना लागला आहे. ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दांनी कालिदासाच्या ‘मेघदूत’ या महाकाव्याची सुरुवात झालेली आहे. म्हणूनच त्या दिवशी जगभर कालिदासाचे स्मरण केले जाते. ‘मेघदूता’वर व्याख्याने, चर्चा, नृत्यनाट्य असे असंख्य कार्यक्रम सादर होतात. कालिदासाबद्दल अनेक आख्यायिका आपल्याला ज्ञात आहेत. त्याला काही मूळ आधार असल्याशिवाय त्या प्रचलित होत नाहीत. त्यातील ऐतिहासिक सत्य शोधून काढणे, ही गोष्ट मात्र अशक्यप्राय ठरते. त्याचे कारण म्हणजे, आपल्या संस्कृत ग्रंथकर्त्यांना आपले कुल, शिक्षण व विद्वत्ता आणि कोणाचा राजाश्रय होता हे सांगण्यात स्वारस्य नव्हते किंवा महत्त्व वाटत नव्हते. स्वत:च्या नावाऐवजी आपली साहित्यकृती लोकमान्य व्हावी, हीच त्यामागची भावना असणार! कालिदासोत्तर अनेक ग्रंथांमधून शेकडो वर्षे त्याच्याबद्दल जे उल्लेख, माहिती मिळते, त्यावरून त्याचे चरित्र ‘उभे’ करावे लागते. परंतु त्यात विश्वासार्हता किती, हाच यक्षप्रश्न आहे. इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील शककर्ता विक्रमादित्य याच्या दरबारात कालिदास हे एक ‘रत्न’ होते, असे सांगणारी एक परंपरा आहे. तिथपासून ते, गुप्त घराण्यातील दुसरा ‘चंद्रगुप्त’ याच्या आश्रयाखाली कालिदास होता, असे काही विद्वान मानतात. याचा अर्थ तो इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात होऊन गेला. कालनिर्णयापेक्षा त्याचा चरित्रातील काही ठळक गोष्टी आणि अजरामर साहित्यकृतींचा विचार करणेच योग्य ठरेल. 

कालिदास दिसायला देखणा होता. त्याचे संस्कृतचे मान मात्र बेताचे होते. योगायोगाने त्याचे लग्न एका विद्वान राजकन्येशी झाले. एकदा एका तलावात ते दोघे जलक्रीडा करत असताना कालिदास तिच्यावर पाण्याचा मारा करू लागला. ती कृतक कोपाने म्हणाली, ‘मोदकै: ताडय माम्।’ (मला पाण्याचा मार देऊ नका.) संधी वगैरे व्याकरणाचे ज्ञान नसल्याने सेवकांकडून त्याने मोदक मागवून घेतले आणि ते पत्नीवर फेकू लागला. तिने संतापाने त्याची खूप निर्भर्त्सना केली. अपमानित होऊन त्याने घर सोडले आणि उत्तम ज्ञानप्राप्ती करूनच परतायचे, असा कृतनिश्चय केला. 

त्याने कालिमातेची भक्तिपूर्वक दृढ उपासना केली. ती प्रसन्न होत नसल्यामुळे स्वतःचा शिरच्छेद करून घेण्यासही तो सिद्ध झाला. त्या वेळी देवीने त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. तिच्या आशीर्वादाने तो परम ज्ञानी बनला. (योग्य गुरूंकडून अल्पावधीतच वेदविद्यादि शास्त्रांमध्ये पारंगत झाला.) घरी परत आल्यावर त्याच्या पत्नीने पृच्छा केली, ‘अस्ति कश्चिद् वाग्विशेष:?’ त्याचा अर्थ असा की, ‘तुमचं आदरानं स्वागत करावं, असं काही विशेष ज्ञान तुम्ही प्राप्त केलं आहे का?’ त्या प्रश्नातील एकेक शब्द घेऊन कालिदासाने तीन महाकाव्ये रचली. ती रामायण-महाभारतासारखी लोकोत्तर ठरली. ‘अस्ति’ शब्दाने ‘कुमारसंभवा’ची सुरुवात झाली (अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा, हिमालयो नाम नगाधिराज:). शिव-पार्वतीच्या पोटी जन्म घेणाऱ्या कार्तिकेयाचे कथानक त्यात आहे. ‘कश्चित’ शब्दाने ‘मेघदूता’ची सुरुवात होते. (कश्चित्कांता विरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः). ‘रघुवंशा’ची सुरुवात ‘वाग्’ने झाली. (वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये). रामाच्या वंशाचे (रघुवंश) वर्णन त्या महाकाव्यात आहे. 

कालिदासाचे एकूण आठ ग्रंथ (काव्य-नाटके) आहेत, ते असे : ऋतुसंहार, रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, कुंतलेश्वरदौत्य (हा आज उपलब्ध नाही), शाकुंतल, विक्रमोर्वशीय आणि मालविकाग्निमित्र. यातील पहिली पाच काव्ये आणि शेवटची तीन नाटके आहेत. (‘एफवाय’ला असताना आम्ही ‘मालविकाग्निमित्र’ शिकलो होतो.)

‘ऋतुसंहार’ या काव्यात सहा सर्ग आहेत. प्रत्येकात १६ ते २८ श्लोक आहेत. वर्षभरात जे सहा ऋतू येतात - ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत - त्यांचे जिवंत वर्णन त्यात येते. प्रत्येक ऋतूत वृक्षलता आणि पशुपक्ष्यांवर होणारे परिणाम, त्याच्या आगमनाने कामी लोकांच्या चित्तवृत्तीत आणि वर्तनात दिसणारे फरक, तसेच मनांतील विविध विचार यांचे वर्णन येते. त्यावरून कवीचे बाह्य सृष्टीवरील प्रेम आणि प्रतिभा किती विलक्षण आहे, याची कल्पना या काव्यामुळे येते. 
‘कुमारसंभवा’चे सतरा सर्ग आहेत. (पूर्वी २२ सर्ग असावेत, असे विद्वानांचे मत आहे) ब्रह्मदेवाच्या वराने तारकासुर उन्मत्त झाला. देवांना त्याचा खूपच त्रास होऊ लागला. तेव्हा त्याच्या नि:पातासाठी शिव-पार्वती यांचा विवाह घडवून आणण्यात आला. त्यांच्यापासून जन्माला आलेल्या कार्तिकेयाला सेनापती करून तारकासुराचा वध करविला, असे एकंदरीत या काव्याचे कथानक आहे. त्यात हिमालयाचे सुंदर वर्णन आहे. हिमालयाला मेनकेपासून झालेली कन्या म्हणजे पार्वती. तिचा जन्म, बाल्य, यौवन यांचे सुरेख चित्रण काव्यात आहे. ती शिवाची पत्नी होईल असे भविष्य नारद वर्तवतो. त्यानुसार, मदनाच्या कामगिरीमुळे शंकराला पार्वतीशी लग्न करण्याची इच्छा होते आणि पुढे त्यांचा विवाह होतो. त्यानंतर कुमार म्हणजे कार्तिकेयाचा जन्म होऊन तारकासुराचा नाश होतो. 

‘मेघदूत’ या खंडकाव्याची मोहिनी मोठी अद्भुत आहे. मराठीत त्याचे अनेक अनुवाद झाले असून, नव्याने होतच आहेत. एका यक्षाने आपल्या कामात काही चूक केल्यामुळे त्याला मिळालेल्या शापानुसार एक वर्ष एकाकी जीवन जगावे लागले. त्यातील आठ महिने झाल्यावर आषाढातील वर्षा ऋतू आला. त्या वेळी मेघांच्या दर्शनाने त्याला प्रियेचा विरह जाळू लागला. पत्नीचीही तीच अवस्था असणार, हे जाणून त्याने त्या मेघालाच आपला दूत म्हणून पाठवायचे ठरवले. मेघाने कोणत्या मार्गाने प्रियेच्या नगरीला जावे, हे यक्षाने सविस्तर सांगितले. वाटेतील नगरे, नद्या, पर्वत, टेकड्या यांचे वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. त्यामुळे तत्कालीन भूगोलही कळतो. शेवटी हिमालय आणि त्यावरील ‘अलका’ या प्रियेच्या नगरीला मेघाने जावे, अशी विनंती यक्ष करतो. पत्नीला द्यावयाचा संदेशही सांगतो. तो मूळ काव्यातून (अनुवादामधून) वाचणे आवश्यक आहे. या काव्यात एकूण १२० श्लोक आहेत. त्यातून कवीची सौंदर्यदृष्टी आणि नाना कलांविषयीची जाण दिसून येते. 

‘रघुवंश’ हे कालिदासाचे सर्वोत्कृष्ट काव्य ठरलेले आहे. त्यात एकूण १९ सर्ग आणि रघुकुलातील २८ राजांचे वर्णन आलेले आहे. रघू हा अत्यंत पराक्रमी आणि दानशूर राजा. त्याच्यावरूनच ‘रघुवंश’ हे नाव कवीने घेतले. पुढे अनेक कथानके आहेत. दिलीप राजाची परीक्षा, अजविलाप, दशरथाची (श्रावणबाळ) मृगया, राम आणि त्यानंतरचे राजे. त्यांच्या उदात्त चरित्रांचे वर्णन केल्यामुळे ‘रघुवंश’ हे संस्कृतमधील अद्वितीय काव्य म्हणून गणले गेले आहे. 

कालिदासाची एकूण तीन नाटके प्रसिद्ध आहेत. जुन्या काळी विविध उत्सवांच्या निमित्ताने राजाच्या आज्ञेनुसार नाटके सादर होत असत. प्रजा त्यांचा आनंद घेत असे. 

‘मालविकाग्निमित्र’ हे पाच अंकी नाटक आहे. अग्निमित्र राजाची पत्नी धारिणी हिच्या सेवेसाठी मालविका नावाची एक सुंदर, शिल्पकलेत निपुण अशी दासी नेमण्यात येते. ती संगीताचे शिक्षणही घेते. अग्निमित्र तिला पाहून आकृष्ट होतो. सर्व कथानकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. विदूषकाचीही महत्त्वाची भूमिका आहे. संस्कृत नाटकात विदूषक हा विद्वान, परंतु राजाच्या सहवासात एक मित्र, सल्लागार, मनोरंजन करणारा असे काम निभावताना दिसतो. पुढे राणी मालकविकेला तळघरात कोंडून ठेवते. परंतु विदूषकाच्या साहाय्याने तिची मुक्तता होते. ती विदर्भ राजघराण्यातील आहे, असेही सर्वांच्या लक्षात येते. अर्थातच मालविकेचा अग्निमित्राशी विवाह होतो. एकूण सर्व घटना आठ-दहा दिवसांतच घडतात. 

‘विक्रमोर्वशीय’ नाटकाचेही पाच अंक आहेत. पुरुरवा आणि उर्वशी या अप्सरेची ही प्रेमकथा आहे. एका शापामुळे तिला काही काळ पृथ्वीतलावर वास्तव्य करावे लागते. राजाच्या सहवासात भोगविलास करून ती स्वर्गात परतते. 

राजा रविवर्माने काढलेले शकुंतलेचे चित्र.कालिदासाला नाटककार म्हणून खरी कीर्ती मिळाली ती ‘अभिज्ञानशाकुंतला’मुळे. त्यातील रचनाकौशल्य, स्वभावांचे रेखाटन, रसपरिपोष, भाषासौष्ठव या वैशिष्ट्यांमुळे नाटक श्रेष्ठपणाला जाऊन पोहोचते. त्याची अनेक विदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली. फ्रेंच विद्वान गटे हा तर ते वाचून अत्यानंदाने नाचू लागला, हे सर्वज्ञात आहे. कण्व मुनींची मानसकन्या शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्या मीलनाची कथा म्हणजे शाकुंतल. आश्रमाच्या परिसरात शकुंतलेच्या सौंदर्याने विव्हल झालेला दुष्यंत तिचे पाणिग्रहण करतो. आपल्या राज्यात परत जाण्यापूर्वी खुणेची एक अंगठी तो तिला देतो. पुढे दुर्वास ऋषींच्या शापामुळे त्याला तिचा विसर पडतो. एका कोळ्याकडून भेट म्हणून आलेल्या माशाच्या पोटातून ती अंगठी राजाला मिळते आणि त्याला शकुंतलेबरोबर झालेल्या विवाहाची आठवण येते. दरम्यान, तिला पुत्र झालेला असतो. ती पित्याच्या आश्रमातच परत गेलेली असते. शेवट अर्थातच गोड होतो. दुष्यंत-शकुंतला पुन्हा एकत्र येतात. (सासरास चालली लाडकी शकुंतला). 

आषाढाच्या निमित्ताने आपण कालिदासाच्या सुंदर रचनांचा अल्प आस्वाद घेतला. त्याच्या काव्य-नाट्यांचे संपूर्ण वाचन केल्याने ‘आत्मानंदा’चा लाभ होतो, यावर सामान्य रसिक आणि विद्वानांचे एकमत आहे. 

(कालिदासाबद्दलची, त्याच्या साहित्याबद्दलची विविध पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. मेघदूताचे विविध अनुवाद खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. मेघदूताच्या अनुवादांविषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZUZCC
 In the terminology of today , was he from Vidarbha?
Or from the region around Ujjaini ?
 Was the language of these epics , the language of everyday use ?
We're these epics written down ? Or , orally handed down ? If
written down , in which script ? These epics exist . So , Kalidas
can not be a myth .
 What is written down matters more than oral traditions . The latter
are subject to distortion , exaggeration , glorification , vilification .
That is why they can not be Looked upon as reliable sources .
 A person with laughable knowledge of a language goes on to
write masterpieces !
Similar Posts
आषाढाच्या पहिल्या दिवशीं... आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, अर्थात महाकवी कालिदास दिन. त्या निमित्ताने, ‘आषाढस्य प्रथम दिवसे’विषयी थोडेसे...
‘माझे जीवनगाणे’ ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र वसंत गुर्जर यांनी आज (२९ एप्रिल २०१८) ७३व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्यांच्या ‘किमया’ सदरात त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर इंग्लंडचा महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपिअर याचा जन्म व मृत्यूचा दिनांक २३ एप्रिल हाच आहे. जागतिक पुस्तक दिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. त्या निमित्ताने, ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी ‘किमया’ सदरातून शेक्सपिअरला वाहिलेली ही आदरांजली...
संस्कृत भाषेच्या उन्नतीसाठी झटणारी पुण्यातील आनंदाश्रम संस्था उच्च न्यायालयात वकिली करणारे महादेव चिमणाजी आपटे यांनी ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मित:’ हे ध्येय समोर ठेवून पुण्यात १८८८मध्ये ‘आनंदाश्रम’ संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था संस्कृतची उन्नती, प्रसार यांसाठी कार्यरत आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत या संस्थेबद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language